राज्य मराठी पत्रकार संघातर्फे खा. राऊतांना निवेदन

जळगाव l खा. संजय राऊत हे पत्रकारिता क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जाण असलेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न राज्यसभेत मांडून महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडावी, यासाठी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगावच्या पदाधिकायांनी त्यांची भेट घेतली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यभरात तसेच जळगाव जिल्ह्यात माध्यम प्रतिनिधी तसेच प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींवर सातत्याने हल्ले होत आहे. मात्र पत्रकार संरक्षण कायद्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याने ठोस अशी कारवाई हल्लेखोरांवर होत नाही. त्यामुळे हल्लेखोरांना त्याचे फावते. आपण लोकसभेत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच पत्रकारांच्या पेन्शन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीने जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. या जाचक अटी काही प्रमाणात शिथिल करून ज्येष्ठ पत्रकारांना देखील आपण न्याय द्यावा.

विशेषतः यामध्ये २५ वर्ष पत्रकारितेची सेवा व वय वर्ष ५० पूर्ण असे नियमात बदल करून लाभार्थी पत्रकारांना पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यासह या मागणीचे निवेदन दिले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव अध्यक्ष कमलेश देवरे, संदीप महाले, काशिनाथ चव्हाण, निखील वाणी यांची उपस्थित होती.

संजय राऊत यांनी दिले आश्वासन 33 पत्रकार बांधवांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा विषय प्रलंबित असून पत्रकारांवरती वाढते हल्ले हा देखील प्रमुख मुद्दा आहे. एक पत्रकार म्हणून मी पत्रकारांच्या बाजूने हा विषय सरकार दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन संजय राऊत यांनी यावेळी दिले आहे.