पाटना: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्याने राजदचे अध्यक्ष चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत राजदला भोपळा मिळाला आहे. राजदने बिहारमध्ये काँग्रेस आणि रालोसपा यांच्याबरोबर महागठबंधन केले होते.
लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला असून त्यांची दिनचर्याही नियमित सुरू नाही. ते ताणावात किंवा कोणत्या चिंतेत असावेत, अशी शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीतील लाजिरवाणा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याच्या शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, औषधे देण्यासाठी त्यांनी वेळेवर जेवण घेतले पाहिजे, असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात आला असून सध्या डॉक्टर त्यांचे समुपदेशन करत आहेत.
लालू प्रसाद यादव हे कोणत्याही तणावाखाली नसल्याचे राजद नेत्याकडून सांगण्यात आले. लालू प्रसाद यादव यांची ही पहिली निवडणूक नसून पराजयामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही निर्देश दिले आहे.