‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले. यावेळी ममतांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला एकाप्रकारे नाकारले. देशाच्या 70 वर्षांच्या इतिहासात 50 वर्षापेक्षा जास्त सत्ताकाळ भोगणार्या काँग्रेसची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. नेमकं काँग्रेसचे धोरण काय आहे? याबाबत कुणातही एकवाक्यता नाही. सन 2014 साली आलेल्या मोदी लाटेत होत्याचे नव्हते झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली. जर गत आठ-दहा वर्षांच्या इतीहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला काँग्रेसचे धोरण व स्वपक्षातील काही नेतेच जबाबदार आहेत. यामुळेच काँग्रेसला 2014 नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. यामुळेच ममतादीदींनी काँग्रे्रसचे नेतृत्व नाकारले असावे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सन 2014 झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशपातळीवर विरोधकांचे अस्तित्व नावापुरता उरले. भाजपाचा चौफेर उधळलेले वारु रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए पूर्णपर्ण अपयशी ठरली. यामुळे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. दरम्यानच्या 10 वर्षात दोन-चार अपवाद वगळता भाजपाचेच पारडे जड राहिले आहे. भाजपाच्या या भक्कम गडला सुरुंग लावण्याचे काम कुणी केलं असेल तर केवळ ममता बॅनर्जी यांनीच! काही महिन्यांपूर्वी झालेली बंगालची विधानसभा निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातही अनेक सभा घेत भाजपच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आम्ही 200 हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा अमित शहा यांच्याकडून केला जात होता. मात्र भाजपाच्या पुर्ण फौजेला एकट्या ममतादीदी उरुन पुरुन निघाल्या. यामुळे सहाजिकच त्यांच्याकडे मोदींविरोधातील भक्कम चेहरा म्हणून पाहिले जात आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदींना टक्कर द्यायची असेल तर भाजप विरोधी सर्व पक्षांनी आपआपसातले मतभेद दूर ठेवून एकत्र आले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत आहे. मात्र यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे, या भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करेल? आतापर्यंत युपीए म्हणून ओळखल्या जाणार्या भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. सोनिया गांधी याच युपीएच्या सर्वेसर्वा म्हणून कार्यरत होत्या मात्र गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षच अडचणीत आहे. पक्षात राहुल गांधी समर्थक व जेष्ठ नेत्यांचा नाराज गट असे उघडपणे दोन गट पडले आहेत. नाराज नेत्यांच्या गटाला जी-23 असेही संबोधले जाते. जी-23 नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते त्या 23 नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पंजाबमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठनेते तथा पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अलीकडच्या काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे मानले जावू लागले आहे. काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘काँग्रेसची आजची स्थिती रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे असे मार्मिक भाष्य केले होते. जे काँग्रस पक्षाला चपखलपणे बसते. दोन आठवड्यांपूर्वी नवडणूक राजकारणावर नजर ठेवणारी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने एक अहवाल प्रसिध्द केला होता. त्या अहवालानुसार, गत सात वर्षात एकूण 222 नेते काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले. यामध्ये 177 खासदार आणि आमदारांचाही समावेश आहे, लोकसभेत 2014 मध्ये पराभव झाल्यावर काँग्रेस आणखी जर्जर झाली असून आपले नेतेही सांभाळता येत नाहीत हे वरील दोन्ही बाबींवरुन अधोरेखीत होते. यामुळे अनेकपक्ष काँग्रसचे नेतृत्व मानायला तयार नाही. नेमकी हीच बाब हेरुन ममता बॅनर्जी यांनी हालचाली सुरु केलेल्या दिसतात. त्यांनी नुकताच केलेला मुंबई दौरा याच रणनितीचा भाग असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शरद पवार यांच्याकडे विरोधीपक्षांचे नेतृत्व जाण्याची हवा असली तरी ममता बॅनर्जी यांच्या मनात काही तरी वेगळेच सुरु आहे. शरद पवार यांच्याकडे आपण यूपीएचे नेतृत्व देणार का, असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी, पर्यायाच्या नेतृत्वाबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्याच वेळी शरद पवार यांनी ‘भाजपला मजबूत पर्याय देताना काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत’, अशी भूमिका मांडली. याचा अर्थ पवार यांनी नेहमी प्रमाणे दोन्ही बाजूंवर हात ठेवलेला दिसतो. काँग्रेसने कितीही उसने आवसान आणले तरीही एकट्याने भाजपाचा सामना करता येणार नाही, याची जाणीव काँगेसमधील नेत्यांना आहे. मात्र ते अजूनही सत्य मानायला तयार नसल्याने काँग्रेसचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. सध्यस्थितीला काँग्रेस पक्षाची सगळी इमारत पोखरली गेली आहे. ती पूर्णपणे पाडून नवी बांधायची तयारी दाखवली तरच काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य होईल. नव्या सामाजिक समिकरणांची मांडणी करावी लागेल. भाजप विरोधी पक्षांशी युती करताना स्वत:चा पारंपरिक अहंकार दूर ठेवावा लागेल.