भुसावळ शहरात शनिवार 22 एप्रिल रोजी ईद-उल-फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजल्यापासूनच ईद-उल-फित्रच्या नमाजासाठी लोक ईदगाहकडे जाऊ लागले. उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेऊन यावेळी ईद-उल-फित्रच्या नमाजाची वेळ साडेआठची ठेवण्यात आली होती. भुसावळ शहरापासून खडका रोड येथे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन ईदगाह येथे पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. लोकांनी मुलांना सोबत आणले. शनिवारी मुस्लिम समाजातील लोकांनी पारंपरिक पद्धतीने ईद उल फित्रची नमाज अदा केली. खडका रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता ईद-उल-फित्रच्या नमाजाची वेळ निश्चित करण्यात आली होती. शहरातील जाम मोहल्ला येथील जामा मशिदीचे इमाम रेहान रझा यांनी ईदगाह येथे ईद उल फित्रची नमाज अदा केली. भारत देशासाठी शांतता नांदावी अशी प्रार्थना केली. तसेच देशाची विशेष प्रार्थना करण्यात आली. ईदच्या नमाजासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक ईदगाह मैदानाकडे कूच करू लागले आणि नमाज ठरलेल्या वेळीच अदा करण्यात आली.
शहरातील खडका रोडवर असलेल्या ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या सामूहिक नमाजासाठी ईदगाह कमिटीच्या लोकांनी दोन दिवस अगोदरच ईदगाह मैदानाची तयारी सुरू केली होती. त्याची साफसफाई करून रंगरंगोटी करून पिण्याच्या पाण्याची व वुजूसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नमाज अदा करण्यासाठी आलेल्या बांधवांच्या राहण्याचीही योग्य व्यवस्था करण्यात आली होती. इदगाह समितीच्या सर्व प्रमुखांनी ईदगाह भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. शुक्रवारी एक दिवस आधी डीवायएसपी सोमनाथ वाघचोरे आणि पालिका मुख्याधिकारी संदीप चींद्रवार आणि कार्यालयीन अधीक्षक परवेझ अहमद यांनी इदगाहची पाहणी केली होती.
दोन्ही ईदगाहांची पालिकेकडून स्वच्छता करण्यात आली असून थंड पिण्याच्या पाण्याचे जार व वुजुसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती – पालिका मुख्याधिकारी संदीप चींद्रवार
दरम्यान, ईद-उल-फित्रनिमित्त डीवायएसपी सोमनाथ वाघचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनासह श्वानपथकाच्या मदतीने ईदगाह मैदान व त्यावरील मार्गावर चोख बंदोबस्त पाहायला मिळत होते. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर वाहतूक पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांची मोठी संख्या पाहता खडका रोडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. जामनेर रोडवरील जुन्या ईदगाह मैदानावरही नमाज अदा करण्यात आली.