अमळनेर-शहरातील सराईत गुन्हेगार व प्रा.दीपक पाटील यांच्या खुनाचा आरोपी राज वसंत चव्हाण व त्याचे साथीदार रबिया दुलेखां पटवा यांना प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायाधीश वाय.जे.वळवी यांनी ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी आरोपी राज वसंत चव्हाण व राबिया दुलेखा पटवा या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता त्यांना कोठडी देण्यात आली.
१४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी
यावेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी या प्रकरणातील राज याचा एक साथीदार गणेश उर्फ विजय डेढे यास ताब्यात घ्यायचे असून मोबाईल जप्त करणे बाकी आहे व यासह इतर चौकशी देखील बाकी असून १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.
यावेळी सरकारी वकील वैशाली निरगुडे यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यासह त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्यात वापरलेले एटीएम कार्ड मुद्देमाल ताब्यात घेणे बाकी आहे. आरोपी ज्या ज्या ठिकाणी थांबले होते त्या त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कारवाया याबाबत चौकशी बाकी असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली.