…तर एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत!

0

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा; भाजपाकडून मात्र नकार, खडसे यांनीही फेटाळला दावा
मुंबई:- मागील काही काळापासून भाजप सरकारवर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा अप्रत्यक्ष दावाच राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी जनशक्तिशी बोलताना केला आहे. भाजपातीलच नाहीतर शिवसेनेतील देखील काही बडे नाराज नेते पक्षाच्या संपर्कात असून ते निवडणूका जाहीर होताच पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पक्षातून २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात आमदार आणि नेते भारतीय जनता पक्षात गेले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणामुळे हे गयाराम आता आयाराम होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगावमध्ये मेळावा घेणार असून त्यात भाजपाचे मोठे नेते पक्षप्रवेश करतील याबाबत एकनाथराव खडसे यांनी मात्र काहीही मत व्यक्त करण्यास नकार दिला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर भाजपा सोडण्यासाठी दबाव असल्याचे मलिक यांनी सांगितले. खडसे यांच्यासारखे मोठे नेते पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे असेही मलिक यावेळी म्हणाले. याविषयी खडसे यांच्याशी संपर्क केला असता दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पक्ष सोडणार नाही अशा शब्दात मलिक यांचा दावा जनशक्तिशी बोलताना फेटाळून लावला आहे.

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. अलीकडे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावरील चौकशी समिती असलेल्या झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक म्हटल्याने खडसेंची घरवापसी लांबणीवर गेली आहे. दरम्यान अधिवेशनात देखील काँग्रेसकडून खडसे यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या. मात्र त्या खुद्द खडसे यांनी सभागृहात नाकारल्या होत्या. मलिक यांच्या या दाव्यानंतरही खडसे यांनी मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही असे सांगत पुन्हा पक्षबदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान ही राष्ट्रवादीचीही जुनी खेळी आहे, एकनाथराव खडसे भाजप सोडणार नाहीत असे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी देखील स्पष्ट केले आहे.

जळगावमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. यावेळी अनेकजण नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये गेलेले राज्यातील अनेक नेते घरवापसी करणार आहे. त्याबाबत अनेकजण पक्षनेतृत्वाशी चर्चा करत आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसेच राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो असे म्हणत खडसेंच्या प्रवेशाबाबत संकेत दिले. उद्या अजित पवार यांच्यासह खडसे आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन जळगावात एकाच मंचावर येणार असल्याचे देखील मलिक यांनी सांगितले.