पुणे :- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीप्रकरणी खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लोजर रिपोर्ट फाइल करून नुकतीच क्लीन चिट दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एच मोहंमद यांच्या न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि गुन्ह्यातील फिर्यादी यांना म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
हे देखील वाचा
अंजली दमानिया यांच्या वतीने न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल
भोसरी एमआयडीसीतील सुमारे ३१ कोटी रुपये किमतीची जमीन पावणेचार कोटी रुपयांना दिल्याचा आरोप खडसे यांच्यावर लावण्यात आला होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक हेमंत गवांडे यांनी फिर्याद दिली होती. खडसे यांना जून २०१६ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सर्व पुरावे देऊनही एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केल्याच्या अनुषंगाने अॅड. असीम सरोदे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या वतीने न्यायालयात सोमवारी हस्तक्षेप अर्ज दाखल केला. त्यामुळे अंजली दमानिया यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लोकप्रतिनिधींनी केलेला भ्रष्टाचार गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालाची प्रत मिळावी आणि दमानिया यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे अॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ५ जूनला होणार आहे.