‘जे दु:ख माझ्या वाटेला आले ते इतरांच्या येऊ नये’ ; खडसेंनी व्यक्त केली खदखद !

0

मुंबई : भाजपा-शिवसेना सरकारच्या काळातील शेवटच्या अधिवेशनाच्या शेवट काल मंगळवारी झाला. मात्र शेवटच्या दिवशी विधानसभेत माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे भावनिक झाले. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही सल अजूनही खडसेंच्या मनात आहे. वारंवार त्यांनी ही सल बोलूनही दाखवली आहे. पुन्हा आपल्या मनातील खदखद, सल त्यांनी विधानसभेत बोलून दाखविली आहे. ‘जनमानसात चांगली प्रतिमा सल्याने गेल्या ३० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही. राजकीय आयुष्यात राजकीय व्यक्तीकडून कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. मात्र आता जे आरोप झाले ते विधानसभेबाहेरच्या व्यक्तीने बिनापुराव्यानिशी आरोप केले. सर्व आरोपाच्या चौकशीतून तावून सलाखून निर्दोष सुटलो, शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. पुन्हा सर्व आरोपांची चौकशी करा. कोणी खोटे आरोप करत असेल तर त्यालाही कठोर शिक्षा करा, तसा कायदा करा. मला हा डाग घेऊन जायचे नाही, असे भावनिक भाषण करत मनातील खदखद पुन्हा व्यक्त केली.

तीन वर्षांत मलाही अनेकांवर आरोप करता आले असते, अनेकांच्या फाईलींचे गठ्ठे माझ्याकडे जमा आहेत, पण माझ्यावर आली ती वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून मी गप्प राहिलो. विरोधी पक्षनेता असताना मीही आरोप केले. पण पुराव्यानिशी केले. माझ्यावरील आरोपांमुळे जे भोगलेय त्याच्या वेदना आजही होत आहेत. यापेक्षा अधिक वाईट प्रसंग माझ्या जीवनात येऊ शकत नाही, असे सांगत काही चुकीचे बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो, असे सांगत खडसेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.

दरम्यान आमदार खडसे यांनी यावेळी त्यांच्यावर जे जे आरोप झाले त्या सर्व आरोपांचा उल्लेख करत त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सांगितले. पहिला आरोप झाला तो कुख्यात गुंड दाउदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे, कोणीतरी हॅकर मनीष भंगाळेला पुढे केले. एटीएसपासून सगळयांनी चौकशी केली. पण तथ्य आढळले नाही. माझ्या जावयाची लिमोझीन गाडी असल्याचा आरोप झाला. त्याने ती गाडी घेतली होती २०१२ मध्ये आणि तो माझा जावई झाला २०१३ मध्ये. ती मॉडिफाइड कार होती. ओरिजनल लिमोझीन नव्हतीच, असे खडसे म्हणाले. एमआयडीसीच्या जमिनीचा आरोप झाला. ती एमआयडीसीची नव्हतीच. माझा जमिनीशी संबंधही नव्हता. माझ्या पत्नीने ती घेतली होती. वडिलोपार्जित शेतीशिवाय माझ्या नावावर कोणताही उद्योग नाही. शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज नाही असेही खडसे म्हणाले.