मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही – खडसे 

0
मुंबई:- भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी एकनाथ खडसेंनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला. खडसेंनी आता मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे बोलून दाखविले आहे. तसेच राज्य सरकारमध्ये पुन्हा सहभागी होण्यास माझी काही इच्छा नाही, असे देखील ते म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदी घोटाळा, तसेच दाउदच्या पत्नीशी झालेले संवाद असे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना याचं महिन्याच्या सुरूवातीला भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला. या निर्णयामुळे खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खडसे म्हणाले की, भाजपातून बाहेर पडण्याचा कुठलाही विचार नसून पक्ष मला माझ्या कुटुंबासारखा आहे. माझ्या कठीण वेळेत पक्षाने मला खूप मदत केली आहे’. असेही ते म्हणाले आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केला ते आता उघड्यावर पडले आहेत. मला राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2019 च्या निवडणुकीला फक्त एक वर्ष बाकी आहे. त्याआधी काही स्थानिक निवडणुकाही होतील. आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने सरकारला फार विकासकामं करता येणार नाहीत, म्हणूनच राज्य मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची इच्छा नसल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले.