सुरेशदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी बाळासाहेबांकडे घेउन गेलो

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची खळबळजनक माहिती

जळगाव – सुरेशदादा जैन आणि माझ्यात टोकाचे मतभेद असतांना सुरेशदादा यांना मुख्यमंत्री करावे म्हणून मी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांकडे घेऊन गेलो होतो असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. दरम्यान यावेळी त्यांनी अशा २५-३० बाबी आहेत ज्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम झाला असल्याचे सांगून त्यांनी आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज त्यांच्या जळगाव येथील मुक्ताई या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले की सन १९९९ मध्ये भाजप आणि शिवसेनेचे 135 आमदार निवडून आले होते आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे 155 आमदार निवडून आले होते. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र होते. त्यामुळे भाजप-शिवसेनेने सरकार बनवावे म्हणून दावा करावा असे अनेकांनी सांगितले. मात्र सरकार बनवण्यासाठी आम्हाला आणखी काही आमदारांची गरज होती. त्यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी मुक्ताईनगर येथे येऊन सरकार बनवणे विषयीचे प्रात्यक्षिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून करून दाखवले होते. नऊ आमदार दादा आणणार होते. तेव्हा गडकरी साहेबांनी मला सरकार बनवण्यासाठी इगो बाजूला ठेवा असे सांगितले. त्यानंतर मी, गडकरी साहेब आणि सुरेशदादा जैन असे तिघेजण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो. त्याठिकाणी मी बाळासाहेबांना सांगितले की, सुरेशदादांना मुख्यमंत्री करा. तेव्हा बाळासाहेब म्हणाले एकनाथराव तुम्ही मनापासून सांगत आहात का? त्यावेळी त्यांना मी हो सांगितले. मात्र हे राज्य एका व्यापाऱ्याच्या हातात देणार नाही असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. तेव्हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब हे किती उच्चकोटीचे व्यक्तीमत्व आहे हे कळाले आणि त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढल्याचे खडसे यांनी सांगितले. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम झाले. ह्या सर्व बाबी कुठेतरी जपून ठेवल्या जाव्या म्हणून आत्मचरित्र लिहिण्याची इच्छाही माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केली.