निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोलसंदर्भातील ट्वीट हटविण्याचे आदेश

0

नवी दिल्ली: १७ व्या लोकसभा निवडणुकीचे ६ टप्पे संपले असून शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी येत्या १९ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्था, माध्यम यांच्याकडून ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या एक्झिट पोल वर्तविला जात आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या एक्झिट पोलसंदर्भात असलेले सर्व ट्विट हटवण्याचे आदेश ट्विटर इंडियाला दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडे एक्झिट पोलसंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल ज्यांचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा ज्यामध्ये एखाद्या पक्षाच्या विजयाबाबत अथवा पराभवाबाबत आकडे सादर केले जातात त्यावर रोख लावली जाते. यापूर्वी आयोगाने तीन माध्यम समूहांना एक्झिट पोलवरून नोटीस बजावून ४८ तासांत त्यावर स्पष्टीकरण मागितलं आहे. त्याच्या एक दिवसानंतर लगेचच आयोगाकडून ट्विटरला हा आदेश देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान अद्याप शिल्लक आहे, मात्र ट्विटर आणि इतर समाज माध्यमांमध्ये एक्झिट पोल संदर्भातील ट्विट झळकू लागल्याने त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. दरम्यान, १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मात्र निवडणूक आयोगाने माध्यमांना परवानगी दिली आहे.