शहादा बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी १३ मे रोजी निवड

शहादा : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांची शनिवारी (ता.१३) मे रोजी निवड होणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे व राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान सभापती पदाची माळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीची १८ जागांसाठी निवडणूक झाली. त्यानंतर सभापती व उपसभापतीच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .१३ मे रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीरज चौधरी व सहाय्यक निवडणूक अधिकारी घनश्याम बागल यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी नुकतीच निवडणूक होऊन त्यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला १४ जागा मिळाल्या. सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पॅनलला तीन, तर पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पॅनलला अवघी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या गटाचाच सभापती व उपसभापती होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे .सभापतीपदी अभिजीत पाटील यांचीच वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपसभापती पदावर कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.