निवडणूक साक्षरतेसाठी निवडणूक साक्षरता क्लब 

0

मुंबई-राज्यामध्ये निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक घटकांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब (ELC) स्थापन करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले असून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर निवडणूक साक्षरता राज्य समिती गठीत करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सामान्य नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरतेसाठी संभाव्य मतदार, नवीन मतदार, निवडणूक पाठशाळा व मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. संभाव्य मतदार स्तरावर नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत.

या क्लबमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सदस्य म्हणून समावेश असणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची कार्यकारी समिती स्थापन करुन निवडणूक साक्षरता क्लब चालविण्यात येणार आहे. नवीन मतदार स्तरावर महाविद्यालय, विद्यापीठांच्या आवारात विद्यार्थ्यांचा समावेश असलेले निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये निवडणुकीचा अनुभव असलेल्या शिक्षकांना सहभागी  करुन घेण्यात येणार असून त्यांच्याद्वारा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

निवडणूक साक्षरता क्लबचा संयोजक कॅम्पस प्रतिनिधी असेल व तो नोडल व्यक्तींना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास मदत करेल. निवडणूक साक्षरता क्लब चालविण्यासाठी प्राधान्याने राज्यशास्त्र विभागातील एक किंवा दोन शिक्षक नोडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून काम पाहतील.

औपचारिक शिक्षण संस्थेचा भाग नसलेल्या सामाजिक घटकातील तरुणांसाठी मतदार केंद्रनिहाय निवडणूक साक्षरता गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या गटांना मतदार केंद्राच्या नावाने निवडणूक पाठशाळा म्हणून संबोधण्यात येईल. निवडणूक पाठशाळेचा नोडल अधिकारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) काम पाहणार आहे. तसेच शासकीय विभाग, शासकीय संस्था, स्वायत्त, निमसरकारी आणि अशासकीय आणि खासगी क्षेत्रात मतदार जागरुकता मंच सुरू करण्यात येणार आहेत.

या घटकातील सर्व कर्मचारी संबंधित मतदार जागरुकता मंचाचे सभासद होऊ शकतील. मतदार जागरुकता मंचासाठी संबंधित नोडल अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम करतील, असेही या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.