खानदेश राज्यातील चार बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक, जळगाव जिल्ह्यातील ‘या’ समितीचा समावेश

भुसावळ : राज्यात बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर आता राज्यातील चार बाजार समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात भुसावळ बाजार समितीचाही समावेश आहे. चार उपबाजार समितींचे विलीनीकरण करण्यासाठी या निवडणुका स्थगित करण्यात येत असून आता नव्याने या बाजार समित्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मात्र त्यामुळे काही महिने पुन्हा या निवडणुका लांबण्याची चिन्हे आहेत.

भुसावळसह चार ठिकाणी निवडणुका लांबल्या

सूत्रांच्या माहितीनुसार, खुलताबाद बाजार समितीचे लासूर बाजार समितीत विलीनीकरण, कुंटूर, ता.नायगाव कृउबाचे नायगाव बाजार समितीत विलीनीकरण, कृउबा आष्टी, ता.वर्धाचे विभाजन करून कारंजा येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करणे तसेच बोदवड कृउबामधून वरणगावचे विभाजन करून ती भुसावळ बाजार समितीत समाविष्ट करावे, असे आदेश राज्याचे पणन सहसचिव डॉ.सुग्रीव सं.धपाटे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांना 6 एप्रिल रोजी दिले आहेत.