वीज महागली ; महावितरणकडून सात टक्क्यांपर्यंत वाढ, अदानी, टाटा, ‘बेस्ट’चेही नवे दर लागू
मुंबई | राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या वीज दरात शनिवारपासून (१ एप्रिल) सरासरी तीन ते सात टक्के वाढ झाली आहे. महावितरणबरोबरच टाटा, अदानी आणि ‘बेस्ट’च्या वीजदरातही वाढ झाली असून, घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
महावितरणचा १०१ ते ३०० युनिट विजेचा दर १० रुपये ८१ पैसे, तर अन्य खासगी कंपन्यांचा वीज दर हा सात ते पावणेआठ रुपये आहे. म्हणजेच महावितरणची वीज तुलनेत महाग असेल.
राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी वीज कंपनीचे २०२३-२४ आणि २४-२५ चे घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषी आदी विविध संवर्गातील ग्राहकांचे वीजदर जाहीर केले आहेत. चारही वीज कंपन्यांच्या स्थिर आकार आणि वीज दरात वाढ झाली असून, सरासरी वीज पुरवठय़ाचा दर साडेनऊ रुपये प्रति युनिटहून अधिक झाला आहे. आयात कोळशाच्या दरात झालेली मोठी वाढ, करोनाकाळात उत्पन्नात झालेली घट, पारेषण खर्चात झालेली वाढ आणि अन्य कारणांमुळे वीज कंपन्यांचा खर्च वाढल्याने ही दरवाढ मंजूर करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीने ६७ हजार ६४३ कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्यासाठी दरवाढीची मागणी केली असताना, आयोगाने ३९ हजार ५६७ कोटी रुपयांची वाढ दोन वर्षांसाठी मंजूर केली आहे. इंधन समायोजन आकार समाविष्ट करून महावितरणने २०२३-२४ साठी १४ टक्के, तर २४-२५ साठी ११ टक्के दरवाढ मागितली होती. मात्र, आयोगाने ती अनुक्रमे २.९ आणि ५.६ टक्के इतकी मंजूर केली आहे.
घरगुती ग्राहकांचा विचार करता गरीब आणि मध्यमवर्गाकडून साधारणपणे दरमहा १०१ ते ३०० युनिट वीजेचा वापर केला जातो. महावितरणचे या संवर्गात एक कोटीहून अधिक ग्राहक आहेत. यंदा ‘बेस्ट’चा या संवर्गासाठीचा प्रतियुनिट वीजदर ७.०४ रुपये, टाटा ७.३३ रुपये, अदानी ७.७६ रुपये आणि महावितरणचा १०.८१ रुपये इतका आहे. त्यामुळे या वर्गासाठी महावितरणची वीज सर्वात महाग असेल. महावितरणची पाणीपुरवठा योजनांसाठीची यंदाच्या वर्षांसाठीची दरवाढ १२ टक्के इतकी असून, कृषी क्षेत्रासाठीची ९ टक्के तर उद्योगांसाठी ४ टक्के इतकी राहील.
‘अदानी’च्या वीजदरात ११ टक्क्यांपर्यंत वाढ
अदानी कंपनीच्या घरगुती वीजग्राहकांच्या दरात यंदाच्या आर्थिक वर्षांत ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. महिन्याला ५०० युनिटहून अधिक वीजवापर करणाऱ्या ग्राहकांचा वीजदर आधीच्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी म्हणजे प्रति युनिट १०.८२ रुपयांवरून १०.७६ रुपये इतका करण्यात आला आहे. अदानी कंपनीचा वीजपुरवठय़ाचा सरासरी दर यंदा प्रति युनिट ८.५७ रुपये तर पुढील वर्षी ८.७६ रुपये राहील. ही वाढ अनुक्रमे २.१८ टक्के व २.१३ टक्के आहे.
‘बेस्ट’च्या वीजदरात साडेचार ते साडेआठ टक्के वाढ
‘बेस्ट’च्या वीजदरात २०२३-२४ मध्ये घरगुती ग्राहकांसाठी साडेचार ते साडेआठ टक्के दरवाढ होणार आहे. स्थिर आकारातही वाढ करण्यात आली आहे. ‘बेस्ट’ला टाटा कंपनीकडून विजेचा पुरवठा होतो. आयात कोळशाच्या दरात वाढ झाल्याने टाटा कंपनीच्या वीज दरात वाढ झाली असून पारेषण खर्चातील वाढ आणि करोना काळात महसुलात झालेली घट यामुळे ‘बेस्ट’चा खर्च वाढला आहे. दरवाढीतून ‘बेस्ट’ची १८७१ कोटी रुपयांची महसुलातील तूट भरून निघणार आहे. ‘बेस्ट’चा वीजपुरवठय़ाचा सरासरी दर पुढील दोन वर्षांत अनुक्रमे ९.०४ व ९.६१ रुपये प्रति युनिट इतका राहील.
टाटा कंपनीकडून पाच ते १२ टक्क्यांची वाढ
टाटा कंपनीच्या वीजदरांमध्ये दोन वर्षांत २३-३८ टक्क्यांची वाढ करण्यास आयोगाने मंजुरी दिली असून, त्यातून यंदाच्या वर्षी सुमारे ८६२ कोटी रुपयांची तूट भरून निघणार आहे. टाटा कंपनीने दरमहा ५०० युनिटहून अधिक वीज वापरणाऱ्यांचे वीजदर थोडे कमी केले आहेत. टाटा कंपनीच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या अनुक्रमे ४६८५ कोटी रुपये आणि ५५०१ कोटी रुपयांच्या वार्षिक महसूल दरपत्रकास आयोगाने मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षे वीजपुरवठय़ाचा सरासरी दर अनुक्रमे ८.४२ आणि ९.४५ रुपये प्रति युनिट राहील.
‘बेस्ट’ महागडी वीज घेणार
दक्षिण मुंबईत वीजेचा वापर वाढत असल्याने ‘बेस्ट’ एक वर्षांसाठी सरासरी ७.५० रुपये इतक्या महागडय़ा दराने ४०० मेगावॉट वीज खरेदी करणार आहे. सुमारे दहा लाख ग्राहकांना वीज पुरविणाऱ्या बेस्टची वीजेची मागणी ९०० मेगावॉटपर्यंत असून उन्हाळय़ात वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढल्यावर त्यात वाढ होते. ‘बेस्ट’ला ६५ टक्के वीज टाटा कंपनी पुरवते. पण, कोळसा व गॅस तुटवडय़ामुळे वीजेचा अपुरा पुरवठा होत असल्याने ‘बेस्ट’ ही महागडी वीज खरेदी करणार असून त्यास आयोगाने मान्यता दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारने वीज व कोळशाचे चुकीचे नियोजन केले. त्यामुळे वीज उपलब्ध करण्यासाठी अवाच्या सव्वा दराने आयात कोळसा आणि महागडी वीज घ्यावी लागली. तरीही ऊर्जामंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहक आणि उद्योगांना दरवाढीची झळ बसू दिली नाही.
–विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, सूत्रधारी व महावितरण कंपनी
‘दरवाढीला आव्हान देणार’ ; महावितरणची दरवाढ २१.६५ टक्के असल्याचा आरोप करीत
महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष होगाडे यांनी ही वाढ अमान्य केली. जनतेची दिशाभूल करणाऱ्या या दरवाढीविरोधात अपीलेट न्यायाधिकरणाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयोगानेही महावितरणची कृषी वीजपुरवठय़ाची दिलेली आकडेवारी अमान्य करून त्याहून कमी वीज पुरविली जात असल्याचे आणि गळती अधिक असल्याचे गृहीत धरले आहे. त्यामुळे वीजदरवाढ मंजूर करण्याची गरजच नसल्याचे होगाडे यांचे म्हणणे आहे.