बंधाऱ्याचे काम नित्कृष्ठ दर्जाचे – चौकशीची मागणी
(अधिकार्यांनी काम बंद करण्याचे सांगुनही मुजोर ठेकेदाराने काम ठेवले सुरुच )
वरणगांव । प्रतिनिधी
सुसरी ( वरणगांव ) शिवारातील वाहत जाणाऱ्या नाल्यावर पाणी अडवण्यासाठी लघू पाटबंधारे सिंचन विभागातंर्गत बंधारा बांधकाम सुरू आहे. मात्र,या बंधाऱ्याचे काम अंत्यत नित्कृष्ठ अशा दर्जाचे होत असुन पावसाळ्यापूर्वी बंधारा पूर्ण करून ठेकेदार शासनाला चुना लावण्याच्या तयारीत असल्याने परीसरातील शेतकरी वर्गात मुजोर ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शासनाच्या प्रामाणिक वरीष्ठ अधिकाऱ्यांनी होत असलेल्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी यासाठी शासनाच्या पाणी अडवा – पाणी जिरवा योजनेतंर्गत लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातुन शेती शिवारातील लहान – मोठ्या नाल्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधले जात आहेत.याच प्रमाणे वनविभागाच्या हद्दीतील सुसरी शिवारातुन वरणगांवच्या भोगावती नदीकडे वाहत जाणाऱ्या नाल्यावर बोदवड रस्त्यावरील श्री .नागेश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागील अवघ्या काही अंतरावर असलेल्या या नाल्यावर पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधला जात आहे. मात्र, बांधकाम होत असलेल्या बंधाऱ्याच्या कामावर नित्कृष्ठ दुय्यम दर्जाचे सिमेंट व वाळु वापरली जात असल्याने ठेकेदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनाला चुना लावण्याच्या तयारीत आहे. परिणामी, या बंधार्याला अवघ्या काही दिवसातच गळती लागण्याची दाट शक्यता असून शासनाच्या लाखो रुपयांचा निधी पाण्यात वाया जाणार आहे. यामुळे शासनाच्या वरीष्ठ प्रामाणिक अधिकार्यांनी याकडे वेळीच लक्ष वेधून नित्कृष्ठ दर्जाचे काम बंद करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ठ करण्यात यावे अशी शेतकरी वर्गातुन मागणी होत आहे .
*मुजोर ठेकेदाराचे काम सुरुच*
बंधार्याचे नित्कृष्ठ दर्जाचे होत असलेल्या बांधकामाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी संबधीत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली असता त्या ठिकाणी माती मिश्रीत नित्कृष्ठ दर्जाची वाळू तसेच अत्यंत नित्कृष्ठ दर्जाच्या सिमेंटचा वापर होत असल्याचे दिसून आले. यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधीत ठेकेदाराला काम बंद करण्याचे सांगीतले. मात्र, मुजोर ठेकेदाराने आपले काम सुरुच ठेवल्याने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला लेखी आदेश का? दिले नाहीत. यामुळे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने तर बंधाऱ्याचे नित्कृष्ठ दर्जाचे काम तर होत नाही ना? तसेच राजकीय वरदहस्त लाभलेला बांधकाम ठेकेदार हा साकरी ता.भुसावळ येथील असल्याने लोक प्रतिनिधींचे त्याच्या कामाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत असलेतरी ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वीच काम तडीस नेवून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या कामाची जिल्हा पातळीवरील प्रामाणिक अधिकार्यांनी दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे .
*सामाजिक संघटना करणार चौकशीची मागणी*
शासनाचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदाराच्या मुजोरीपणामुळे वाया जाणार आहे . तसेच नित्कृष्ट दर्जाच्या बंधाऱ्याला लागणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा काही एक फायदा होणार नसल्याने काही सामाजिक संघटना या बंधाऱ्याबाबत संबधीत अधिकारी व ठेकेदाराच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे बीआरएसपीचे तालुकाध्यक्ष राजु सावळे यांनी सांगितले .