कोल्हापूर :- कोल्हापुरातील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने अभियांत्रिकीचा पेपर अवघड गेल्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. राहुल पारेकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा करमाळ्याचा (जि. सोलापूर) होता. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा विद्यार्थी काल रात्रीपासून बेपत्ता होता.
राहुल पारेकर हा अभियांत्रिकी शिक्षणासाठी कोल्हापुरात राहत होता. राहुल हा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. काल शुक्रवारी त्याचा पेपर झाला. पण पेपर अवघड गेल्याने तो निराश होता. त्याने पेपर अवघड गेल्याचे आपल्या मित्रांनाही सांगितले होते. शुक्रवारी रात्री घराबाहेर पडलेल्या राहुलचा मृतदेह शनिवारी सकाळच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळील रेल्वे मार्गावर आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने पेपर अवघड गेल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. राहुलच्या आत्म्हत्येचे वृत्त समजताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.