मुंबई| महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन महिन्यात दोन वेळा हेलिकॉप्टर अपघात झाला. त्यातून ते जनतेच्या आशीर्वादाने सुखरूप वाचले मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील अशी त्रुटी गंभीर आहे. या मागे घातपात षडयंत्र की सुरक्षेतील त्रुटी याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. दोन महिन्यांत हेलिकॉप्टरचा दोन वेळा अपघात होणे ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील गंभीर चूक असून याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दक्ष राहण्याची सूचना करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
लातूर निलंगा येथील हेलिकॉप्टर दुर्घटना 25 मे रोजी झाल्यानंतर त्याच्या थरारक आठवणी ताज्या असतानाच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिबाग दौर्यावर असताना डोलवी धरमतर येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसताना अचानक हेलिकॉप्टर चालू झाले. त्याचा पंखा चालू होताच सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्र्यांना बाजूला ओढले. अन्यथा मोठा अपघात घडला असता असे वृत्त कळल्यानंतर रामदास आठवले यांनी तीव्र चिंता व्यक्त करून दोन वेळा झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे घातपात तर नाही ना, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Web Title- enquiry of helicopter accident ramdas athawale