आरटीईअंतर्गत प्रवेश १३ एप्रिलपासून

पुणे | शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना येत्या १३ एप्रिलपासून प्रवेश निश्चित करता येणार असून, प्रवेशाची अंतिम मुदत ३० एप्रिल राहणार आहे. पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर १२ एप्रिलला दुपारी तीन वाजतापासून प्रवेशाचे लघुसंदेश पाठवण्यात येणार आहेत.

सोडत कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यंदा आरटीईसाठी विक्रमी अर्ज आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेश निवडीसाठी सोडत काढण्यात आली. यंदा राज्यभरातून १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६४ हजार ३९० इतके विक्रमी अर्ज आले आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी पाल्यांना १२ एप्रिलला दुपारी तीन वाजल्यापासून मोबाइलवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी पालकांना १३ ते २५ एप्रिलपर्यंत आपल्या पाल्यांचे प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून तपासणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे, असे गोसावी यांनी सांगितले.