नगरपालिका कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
एरंडोल – पालिका कार्यालयात जाऊन बांधकाम अभियंत्यास शिवीगाळ व मारहाण करून टेबलावरील कागद पत्रे अस्ताव्यस्त फेकुन दिल्याच्या कारणावरून पोलिसांनी एकास अटक केली. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असुन पालिका कर्मचार्यांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, नगर पालिकेचे बांधकाम अभियंता देवेंद्र अशोक शिंदे हे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास कार्यालयात कामकाज करीत होते. त्याच वेळेस सुनिल मुरलीधर मानुधने हे शिंदे यांच्या कार्यालयात आले व त्यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकाराबाबत मागितलेल्या माहितीची चौकशी केली. त्यावेळी बांधकाम अभियंता शिंदे यांनी तुमची माहिती तयार असून तुम्हाला दहा मिनिटात त्याची प्रत देतो असे सांगितले. त्याचा सुनिल मानुधने याना राग आला. त्यांनी शिंदे यांच्या शर्टाची कॉलर पकडुन शिवीगाळ केली. तसेच टेबलावरील कॉम्पुटरचा की-बोर्ड उचलुन शिंदे यांच्या डाव्या हातावर व पाठीवर मारला. शिंदे यांना मारहाण केल्यामुळे कार्यालयात गोंधळ झाल्याने त्यांचे सहकारी विराज पवार, भुषण चौधरी, निलेश चव्हाणके, कैलास महाजन, योगेश सुकटे यांनी सुनिल मानुधने व देवेंद्र शिंदे यांच्यातील वाद मिटविला. बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख यांना झालेल्या घटनेची माहिती दिली.सायंकाळी अभियंता देवेंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्थानकात सुनिल मुरलीधर मानुधने यांचे विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी तपास करीत आहे. दरम्यान सुनिल मानुधने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थक व विरोधकांनी पोलीस स्थानकात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सुनिल मानुधने यांना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा कर्मचार्यांतर्फे निषेध
बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे यांना मारहाण झाल्याचे समजताच सर्व पालिकेच्या कर्माचार्यांनी मारहाणीचा निषेध करून पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढुन सुनिल मानुधने यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यंत सुनिल मानुधने यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भुमिका कामगारांनी घेतली होती.