शहरात दहा दिवसाआड पाणी पुरवठा
एरंडोल- तालुक्यात यावर्षी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असुन ६४ पैकी सतरा गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.तालुक्यातील सतरा पैकी सोळा गावात खासगी विहिरी अधिग्रहित कण्यात आल्या असुन एका गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असुन दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
एरंडोल तालुक्यातील उमरदे, मुगपाठ, आनंदनगर, खर्ची, पिंपळकोठा प्र.चा.पिंप्री बुद्रुक, जळू, उमरे, मालखेडा, जवखेडे बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, पळासदड, पातरखेडे, भालगाव, नंदगाव याठिकाणी खासगी विहीर अधिग्रहित करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर विखरण येथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्या अंजनी प्रकल्पातील जलसाठा संपुष्टात आल्यामुळे पालिकेच्या स्मशानभूमीतील विहिरीवरून तसेच प्रकल्पातील मृत साठ्यातून शहरात दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेवून शासनाने लमांजन येथील बंधार्यावरून तातडीच्या पाणी पुरवठ्यास योजनेस मंजुरी दिली असुन पालिकेतर्फे या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. शहरासह ग्रामिण भागातील अनेक हातपंप व कुपनलिका बंद पडल्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.ग्रामिण भागात जनावरांच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असुन अनेक ठिकाणी जनावरांसाठी गाव हाळात पाणी टाकले जात आहे.ग्रामिण भागातील महिला सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवरून डोक्यावर हंड्याद्वारे पाणी आणत आहेत. तर अनेक गावात बैलगाडीवर पाण्याच्या टाक्या ठेवुन शेतातून पाणी आणले जात आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात असलेल्या आदिवासी पाडे व झोपडपट्टी भागात पाणी टंचाईची दाहकता गंभीर झाली आहे. शासनाच्या अहवालात तालुक्यातील १७ गावात पाणी टंचाई असल्याचे सांगण्यात आले असले तरी अनेक गावात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कापसाला फटका बसण्याची शक्यता
शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना अंजनी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे शहरात नोव्हेंबर महिन्या पासुनच पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती.पालिकेने डिसेंबर पासुनच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपाय योजना सुरु करून तातडीची लमांजन पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतल्यामुळे पुढील आठ दिवसात शहरातील पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अंजनीसह खडकेसिम,पद्मालय व भालगाव येथील लघुसिंचन प्रकल्प कोरडेठाक पडल्यामुळे तसेच विहिरींची जलपातळी अत्यंत खोल गेल्यामुळे या वर्षी कापसाच्या लागवडीत मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.