लमांजन पाणीपुरवठा योजना पुर्ण तरीही महिलांची पाण्यासाठी भटकंती
एरंडोल – शहरातील पाण्याची समस्या दुर करण्यासाठी शासनाने मंजुर केलेल्या तातडीच्या लमांजान पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यांनतर देखील शहरात दहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे एरंडोल वासियांच्या घशाला कोरड पडली आहे. शहरातील नागरिक त्रस्त झाले असुन महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. लमांजन पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यांनतर सात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते.मात्र दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे पालिका प्रशासन नागरिकांची दिशाभुल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सद्यस्थितीत शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असुन महिलांना पाण्यासाठी शहर भर वणवण फिरावे लागत आहे.शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन शासनाने सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्चाच्या तातडीच्या लमांजन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिली.लमांजन बंधारा ते पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र अशा सुमारे अठरा किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेचे काम देखील पालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर पुर्ण केले.नविन पाणीपुरवठा योजनेची चाचणी देखील यशस्वीपणे करण्यात आली.लमांजन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यामुळे शहर वासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्तता झाली असुन आता सातव्या दिवशी पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती. मात्र नागरिकांची हि अपेक्षा फोल ठरली असुन शहरात आजही दहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
कोट्यावधीच्या निधीचा चुराडा तरी पायपीट
कोट्यावधी रुपये खर्च करून देखील नागरिकांना पाण्यापासुन वंचित राहावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गातुन केली जात आहे. याबाबत पालिकेतील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. लमांजन पाणीपुरवठा योजना पुर्ण झाल्या नंतर देखील शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत पालिकेने त्वरित दखल घेऊन शहरात पाणीपुरवठा करण्याचे वेळा पत्रक जाहीर करावे तसेच पाणीपुरवठा केंव्हा सुरळीत होईल याची माहिती शहर वासियांना द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात नादुरुस्त असलेले हातपंप देखील त्वरित दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.