जागतिक मातृदिनी दुबे परिवारावर दु:खाचा डोंगर
एरंडोल- एरंडोल येथील आईने जागतिक मातृदिनी मुलाचा विरह सहन न झाल्यामुळे आपले प्राण सोडल्याची घटना आज घडली.तरुण मुलाचे दहा दिवसापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाल्यामुळे मानसिक दृष्टया खचल्यामुळे ७८ वर्षीय वृद्ध आईचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील पदमाई पार्क मध्ये घडली. दहा दिवसात घरातील दोन जणांचे निधन झाल्यामुळे दुबे परिवारावर दु:खाचाच डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी,कि शहरातील पदमाई पार्क येथील रहिवासी तथा राज्य परिवहन महामंडळातील निवृत्त कर्मचारी मधुकर त्रंबक दुबे यांचा मुलगा मिलिंद मधुकर दुबे (वय ५२) यांचे १ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.त्याच्या उत्तर कार्याचा कार्यक्रम उद्या (ता.१३) होणार होता.मिलिंद दुबे हे सुमारे आठ ते दहा वर्षांपासुन आजारपणामुळे अंथरुणावर होते.त्यांचे बंधु मुकेश दुबे व नितीन दुबे हे दहा वर्षांपासुन भावाची संपुर्ण सेवा करीत होते.मुलगा मिलिंद याच्या आजारपणामुळे त्याची आई उषाबाई दुबे या देखील अस्वस्थ झाल्या होत्या. १मे रोजी मुलगा मिलिंद याचे दुखःद निधन झाल्यामुळे आई उषाबाई देखील मानसिक दृष्टया खचुन गेल्या होत्या.तरुण मुलाचा मृत्यु झाल्यामुळे वृद्ध आईने देखील आज सकाळी प्राण सोडल्यामुळे दुबे परिवारावर शोककळा पसरली आहे.उत्तर कार्याची सर्व तयारी दुबे परिवार करीत असतांना मिलिंदची आई उषाबाई मधुकर दुबे (वय ७८) यांची तब्येत बिघडली. दुबे परिवाराने डॉक्टरांना बोलावले असता डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगताच दुबे परिवारावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. शहरात दुबे परिवाराची सर्वांच्या सुख दुखाःत सहभागी होणारा परिवार म्हणुन ओळख आहे. ९२ वर्षीय सेवा निवृत्त कर्मचारी मधुकर दुबे यांना वृद्धापकाळात दहा दिवसांपुर्वी तरुण मुलाच्या मृत्यूचा आघात सहन करावा लागला. या आघातात्तून ते सावरत नाहीत तोच दैवाने त्यांच्यावर पत्नीच्या निधनाचा दुसरा आघात घातला. आज सकाळी उषाबाई दुबे यांचे निधन झाल्यामुळे शहरातील असंख्य नागरिकांनी तसेच मित्र परिवाराने दुबे यांच्या निवासस्थानी धाव घेऊन दुबे परिवाराचे सात्वन केले.