मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत उलटून देखील राज्याला मुख्यमंत्री मिळाला नाही. एकीकडे शिवसेना ५०-५० टक्के पदावर अडून बसली असून, भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेतली जाताना दिसत नाही. भाजपा-शिवसेनेतील तणावामुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा पुलोद सारखा राजकीय प्रयोग होण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळं शरद पवारांसह दोन नेत्यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची शनिवारी बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत. समाजातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत,असं अजित पवार म्हणाले होते. वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. सभागृहात नसलेली, राज्यसभेची सदस्य असलेली, समाजात महत्त्वाचं स्थान असलेली व्यक्ती म्हणजे कोण? याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे यामुळे राज्यात पुन्हा एकदा पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) सारखा राजकीय प्रयोग होण्याची चिन्हे दिसत आहे.
अजित पवारांनी केलेल्या सूचक विधानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शरद पवार सध्या पक्षाच्या अध्यक्षपदाबरोबर राज्यसभेचे खासदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली नसली तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला इतर पक्षातून पाठिंबा मिळू शकतो. शिवसेनेकडं ६३ आमदारांचं संख्याबळ असून, त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा क्रमांक येतो. तर शिवसेनेला पाठिंबा द्यावा, या मताचा एक प्रवाह काँग्रेसमध्येही आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज (रविवार) सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.