जादा भाडे उकळल्यास परमिट रद्द!

0

परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी ट्रॅव्हल्सवाल्यांना ठणकावले
दुप्पट-तिप्पटदराने भाडेवाढ, प्रवाशांची लूट सुरुच!

पुणे : उन्हाळी सुट्यांचा काळ सुरु झाल्यानंतर गावाकडे परतण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सवाले दुप्पट-तिप्पट दराने भाडे आकारत असून, प्रवाशांची अक्षरशः लूट करत आहे. ही लूट रोखण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कठोर शब्दांत निर्देश दिले असून, जादाभाडे आकारल्यास खासगी बसचे परमिट रद्द केले जाईल, अशा इशारा दिला आहे. ग्राहकांनी आपल्या तक्रारी स्थानिक परिवहन अधिकार्‍यांकडे नोंदवाव्यात, असेही रावते यांनी सांगितले. या संदर्भात राज्यभरातून तक्रारी येत असल्याचेही त्यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले.

नियमानुसार भाडे आकारण्याची ताकिद
सद्या उन्हाळी सुट्या लागल्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. बसेस व खासगी ट्रॅव्हल्स भरुन वाहात असून, त्याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी दुप्पट-तिप्पट दराने भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची अक्षरशः लूट सुरु आहे. वास्तविक पाहाता, बसचे जे भाडे असेल त्याच्या दुप्पट दरापर्यंत भाडे आकारता येते. परंतु, बसभाड्याच्या तिप्पट ते पाचपट भाडेवाढ करून खासगी चालकांनी हंगामाचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची लूट सुरु केली आहे. या बाबतच्या असंख्य तक्रारी राज्य परिवहन खात्याकडे आल्यानंतर याबाबत कठोर कारवाईचे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. याबाबत बोलताना रावते म्हणाले, की आम्ही नुकतीच सात खासगी बस चालकांवर कारवाई केली असून, काही बसेसचे परमिट रद्द केले आहे. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहील. उन्हाळी सुट्यात प्रवाशांची मोठी गर्दी असते. राज्य परिवहन महामंडळाला बसेसची संख्या वाढविण्याची सूचना केली आहे. तसेच, खासगी चालकांनाही बसभाडे नियमानुसारच आकारण्याची ताकिद दिली आहे, असेही रावते यांनी सांगितले.

हेवी टोल, कर, आणि डिझेलच्या वाढत्या दराने खर्च वाढला!
पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी सांगितले, की ज्या नियमित बसेस आहेत, त्या नियमितच भाडे आकारत आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार, काही विशेष बसेस सोडल्या जात आहेत. त्यांचे दर मात्र थोडे अधिक आहेत. कारण, राज्य बसेसला टोल भरावा लागत नाही. परंतु, खासगी बसेसना टोल भरावा लागतो. त्यामुळे हे भाडे थोडे जास्त असते, असेही खेडेकर यांनी सांगितले. या शिवाय, कर, डिझेल, पार्किंग चार्जेस यांचाही भार बसमालकांवर पडत आहे. दिवसाकाठी एका बसला जवळपास 2500 रुपये टोल भरावा लागत असून, त्याव्यतिरिक्त करही भरावा लागत आहे. त्यामुळे सर्वच प्रवासी भाड्यात सरासरी वाढ झालीच आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकारने खासगी बसेसना टोल माफ केला तर भाडेदर थोडे कमी करता येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.