अमळनेर प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. में होटच्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय ३३ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा हा पहिलाच बळी असल्याचे बोलले जात आहे. अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात रुपाली राजपूत ह्या या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होत्या. रुपाली राजपूत ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटोपून त्या गुरुवारी सायंकाळी रेल्वेने परत अमळनेर शहरात घरी परतल्या घरी आल्यानंतर अचानक त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. यामुळे रूपाली यांना | पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले, उष्माघाताची लक्षणे असल्याचे सांगत डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन प्राथमिक उपचार केले. थोडा वेळ रुपाली यांना बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चकर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी १०.३० वाजता तात्काळ रिक्षा करून रूपाली यांना शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी पोहाचण्याआधीच रूपालीची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.