कोव्हिड – १९ ला जागतिक आणीबाणीतून वगळलं

नवी दिल्ली

तब्बल चार वर्ष संपूर्ण जगभरात ज्यामुळे मोठी उलथापालथ झाली. ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं होतं, त्या कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या वर्गवारीतून वगळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोव्हिड – १९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसस म्हणाले, काल आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. यावेळी, माझ्याकडे शिफारस करण्यात आली

की, मी जगभरात कोव्हिड – १९ आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही याबाबतची घोषणा करावी. मी त्यांचा सल्ला स्वीकला असून याबाबतची घोषणा करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० जानेवारी २०२० रोजी कोव्हिड – १९ ला जागतिक आणीबाणी जाहीर केलं होतं. ही घोषणा केली तेव्हा चीनमध्ये केवळ १०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तोवर कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. परंतु तीन वर्षांनंतर ही संख्या ७० लाखांच्या पुढे गेली. आतापर्यंत जगभरात २ कोटींहून अधिक लोकांनी प्राण गमावले असावेत. यावेळी डॉ. टेड्रोस यांनी हेदेखील स्पष्ट केलं की, करोना या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेतून वगळलं तरी कोराना अजूनही संपला नाही.