अग्निशमन साधने तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट

अहमदनगर

जामखेडमध्ये मोठ्या इमारतीत वापरण्यात येणारी स्वयंचलित अग्निशामक उपकरणे (फायरबॉल) तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊ आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तापमानाचा पारा चाळीशी पार असताना शनिवारी भर दुपारी ही घटना घडली. अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. स्फोटामुळे कंपनीच्या भिंतीला भगदाड पडले. दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे (वय ४५ रा. घोडगाव. ता. जामखेड) व झहीर सत्तार मुलानी (वय ३५ रा. तेरखेडा, ता कळंब) यांचा मृत्यू झाला. तर कारखान्याच्या बाजूला थांबलेले दोघे जखमी झाले आहेत. जामखेड शहरातील नगररोडवर पंकज शेळके यांच्या मालकीचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर हा कारखाना आहे. सुमारे दोन वर्षांपासून तेथे अग्निशामक साधने तयार केली जातात.