पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र, ‘सरल डेटाबेस’मधून अर्ज करताना काही ज्युनिअर कॉलेजना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे, तर ज्युनिअर कॉलेजना चलन व शुल्क भरण्यासाठी १२ ते १७ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे. चलन व शुल्क भरल्यानंतर ज्युनिअर कॉलेजना १९ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांची यादी जमा करायची आहे.