मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. आज एकूण 13 जणांचा शपथविधी संपन्न होईल. यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश आहे. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरू होत आहे. दरम्यान मात्र, भारत-पाकिस्तान सामन्याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच कॅबिनेट बैठक घेण्यात येणार आहे.
मात्र, भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना असल्याने पत्रकार परिषद आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांकडे कोणी फारसे लक्ष देणार नाही, अशी भीती भाजपाच्या वरिष्ठांना वाटत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आधी सायंकाळी 6 वाजता ठरलेली पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता घेण्यात येणार आहे.
याचबरोबर एकीकडे भाजपचे मंत्री शपथ घेत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांचीही बैठक सुरु होणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला असून दुसरा क्रमांक जयदत्त क्षीरसागर आणि तिसरी शपथ आशिष शेलार यांना देण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील आठ जणांचे मंत्रिपद जाणार आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांच्यासह आणखी दोघांना नारळ देण्यात येणार आहे.