मुंबई: राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. लांबलेला पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कृषीउत्पादन आठ टक्क्यांनी कमी होईल, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांना कसा आधार देतील याकडे लक्ष लागले आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप – शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती.