मुंबई । गतवर्षीप्रमाणेही यंदा 1 ते 10 जूनदरम्यान बळीराजा संपावर चाललाय. त्याच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आली आहे. देशातील 22 राज्यांमधील शेतकरी या संपात उतरणार असून, या दहा दिवसांमध्ये दिल्ली, मुंबईसह 128 शहरांचा भाजीपाला, फळे आणि दूध पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रीय किसान महासंघाचे महाराष्ट्राचे मार्गदर्शक बुधाजीराव मुळीक यांनी दिला आहे. त्यामुळे प्रमुख शहरांमधील नागरिकांनी 10 दिवसांसाठी लागणारा भाजीपाला साठवून ठेवावा.
1 ते 10 जून दहा दिवसांचा कार्यक्रम निश्चित
महाराष्ट्रातील शेतकर्यांनी गेल्या 1 जून रोजी केलेल्या संपानंतर कर्जमाफीची मागणी सरकारला पूर्ण करावी लागली. महाराष्ट्रातील या आंदोलनाच्या यशानंतर त्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्याच माध्यमातून देशव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पहिल्या दिवसानंतर संप सुरू आहे की आंदोलन मागे घेण्यात आले याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. या वेळी हे प्रकार टाळण्यासाठी 1 ते 10 जून या दहा दिवसांचा निश्चित कार्यक्रम देण्यात आला आहे.
दुधाला 100 रुपये दर द्या
सरसकट सातबारा कोरा करा, खतांचे अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यावर द्या , जैविक शेतीसाठी एकरी 8 हजार रुपये अनुदान द्या, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दोन महिने आधी जाहीर करा, किमान विक्री किंमत जाहीर करा, हमीभाव न देणार्यांविरोधात गुन्ह्यांची तरतूद करा, गोहत्या बंदी मागे घ्या, अनुत्पादक जनावरे सांभाळणार्या शेतकर्यांना 2 हजारांचे अनुदान द्या, देशी गाईच्या दुधाला 100 रुपये, तर म्हशीच्या दुधाला 80 रुपये भाव जाहीर करा, धरणाचे पाणी थेट पाइपद्वारे शेतीला द्या या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.
दहा दिवस भाजीपाला विक्री बंद
त्यानुसार शेतकर्यांनी त्यांच्या शेतीमालाचे नियोजन करावे. मात्र, या दहाही दिवसांत भाजीपाला, फळे आणि दूध यांची विक्री बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 1 जून – संपाला सुरुवात, 5 जून – धिक्कार दिवस, 6 जून – श्रद्धांजली दिवस, 8 जून – असहकार दिवस, 9 जून – सामूहिक उपोषण दिवस, 10 जून – भारत बंद, असे एकूण दहा दिवसांचे नियोजन आहे.