नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय होत नसल्याने आंदोलन सुरूच आहे. २६ जानेवारीला आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दरम्यान सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात देखील शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटत आहे. आज बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले. एका दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांच्या घोषणाबाजी आणि गोंधळाला पाहून सभापतींनी त्यांना त्यांना निलंबित केले. संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता असे तिन्ही खासदारांचे नाव आहेत.
शेतकर्यांच्या प्रश्नावर कामकाज तहकूब करण्याची नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान शेतकरी आंदोलनावर सभागृहात चर्चा होणार आहे. शेतकरी मुद्द्यावर १५ तास चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.