शेतकरी प्रश्नावर देशभर स्वाक्षरी मोहीम

0

नाशिक – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडीत असलेल्या दोन विधेयकांबाबत ‘स्वाभिमानी’कडून मे महिन्यात संपूर्ण देशात स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. तर, १ मे पासून राज्यात ‘शेतकरी सन्मान अभियान’ केले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जवळपास देशातील १९२ संघटनांनी एकत्र येत दोन विधेयक तयार केले आहेत. या विधेयकांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अशा दोन प्रमुख मागण्या आहेत. हे दोन विधेयक संसदेत मांडण्यासाठी सरकारने आठ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी महत्त्वाची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

या अधिवेशनाला देशातील शेतकऱ्यांचा असलेला पाठिंबा दाखवण्यासाठी मे महिन्यात संपूर्ण देशातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या सह्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शेट्टी यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी १ मे पासून ‘शेतकरी सन्मान अभियान’ राबवण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

धुळे जिल्ह्यातील आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून या अभियानाला सुरुवात केली जाणार आहे. नऊ दिवसीय या अभियानाची सांगता उस्मानाबाद येथे होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. राजू शेट्टी म्हणाले, की या संपूर्ण अभियानादरम्यान वेगवेगळ्या गावात जाऊन सभा घेण्यात येणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून आत्महत्या थांबविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशीही त्यांनी माहिती दिली.