शेतकर्‍यांना आता मदतीची आस

0

भुसावळचे आमदार संजय सावकारे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिली भेट

भुसावळ: ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच प्रशासनाने मात्र पंचनाम्यांना वेग देवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यात शासनाकडून प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे तर शुक्रवारी भुसावळचे आमदार संजय सावकारे व मुक्ताईनगरचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधांवर जावून भेट देत शेतकर्‍यांचे सांत्वन केले शिवाय तातडीने पंचनामे होवून शेतकर्‍यांना भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

भुसावळचे आमदार संजय सावकारेंनीही दिला दिलासा

भुसावळ शहर व तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानंतर संकटात असलेल्या शेतकर्‍यांना आमदार संजय सावकारे यांनी धीर दिला. शुक्रवारी त्यांनी तालुक्यातील साकरी, खडका सह विविध भागातील शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देवून नुकसानीची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी किधारी राहणे तसेच अन्य विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुक्ताईनगरचे आमदार पोहोचले शेताच्या बांधावर

तालुक्यात ऐन दिवाळी परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश नवनिर्वाचित अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे व्हायलाच पाहिजे यात सुस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, अश्या शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांना ठणकावले आहे. तहसीलदार, तलाठी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांना थेट शेताच्या बांधावर नेत पंचनामे करायला लावल्याने त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे यावेळी अधिकार्‍यांना त्यांनी बजावले. सारोळा, निमखेडी खु.॥ येथे पंचनामे करतांना त्यांच्यासह नायब तहसीलदार झांबरे, कृषी अधिकारी महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, गोपाळ सोनवणे, दीपक पवार, आनंदा वाघ, महेंद्र गवळी, संचालाल वाघ आदी उपस्थित होते. यानंतर ते बोदवड तालुक्यातील हिंगणा, बोदवड, शेलवड, जामठी, येवती येथे पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मार्गस्थ झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील सचिवांशी तात्काळ मदती संदर्भात चर्चा केली आहे.

प्रत्यक्ष बांधावर जावून पंचनामे करा -तहसीलदार

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्याने भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आठवडाभरात शासनाकडे अहवाल द्यावा तसेच बसल्या जागी पंचनामे न करता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून पंचनामे करावेत शिवाय प्रत्येक गावात अधिकारी अचानक भेट देऊन पंचनाम्यांचा आढावा घेतील, असा इशारा तहसीलदार दीपक धीवरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत दिला.

तहसीलमध्ये अधिकाऱ्यांची बैठक

शहर व तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परीषदेतर्फे तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. प्रसंगी संतप्त शेतकर्‍यांना तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावून तालुक्यात संयुक्त पंचनामे करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गुरूवारपासून तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतीचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी तहसीलदार दीपक धीवरे यांनी गटविकास अधिकारी विलास भाटकर, तालुका कृषी अधिकारी पी.के.राहाणे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व मंडळाधिकारी यांची बैठक बोलावली होती.
गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांनी तात्काळ त्यांच्या नियुक्तीच्या जागेवर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे, असा सूचना तहसीलदार धीवरे यांनी दिल्यात. दरम्यान, पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातर्फे प्रत्येक गावात एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला असून तहसीलदार हे थेट पालक अधिकार्‍याला फोन करून पंचनाम्यांची स्थिती जाणून घेणार आहे. तालुक्यातील 54 गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक असे कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.