नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवस देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरु केला आहे. २०१४ पासून हा कार्यक्रम सुरु आहे. आज रविवारी २९ नोव्हेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधत पुन्हा एकदा संसदेने पारित केलेल्या कृषी कायद्याचे समर्थन करत हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा पुनरुच्चार केला आहे. “देशात शेती आणि त्याच्याशी निगडीत नव्या गोष्टी जोडल्या जात आहेत. कृषी क्षेत्रातील नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवीन अधिकारी दिले आहे , सोबतच नवीन संधी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अधिकारांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या अडचणी देखील दूर होऊ लागल्या आहेत. देशाच्या संसदेने या कायद्यांवर खूप विचार करुन त्यांना मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांवरील अनेक बंधन या कायद्यामुळे नष्ट झाली आहेत आणि त्यांना नवे अधिकार मिळाले आहेत. यातून नव्या संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहेत”, असे मोदींनी यावेळी सांगितले आहे.
पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचा गेल्या गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नव्या कृषी कायद्यावरुन आंदोलक शेतकऱ्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. देशातील काही शेतकऱ्यांची उदाहरण देत नव्या कृषी कायद्यांचे महत्व मोदींनी यावेळी पटवून दिले.
‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदींनी महाराष्ट्रातील जितेंद्र भोई या शेतकऱ्याचा उल्लेख केला. जितेंद्र भोई यांनी नव्या कायद्याचा फायदा उचलत आपली थकबाकी वसूल केल्याचे मोदींनी सांगितलं. ”नव्या कायद्याअंतर्गत संबंधित क्षेत्रातील एसडीएमला केवळ एका महिन्यात शेतकऱ्याच्या तक्रारीचं निवारण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा फायदेशीर कायद्याची ताकद हाती असल्यामुळे जितेंद्र यांची अडचण दूर झाली. त्यांनी तक्रारीची नोंद केली आणि अवघ्या काही दिवसांत त्यांना थकबाकी मिळाली”, असं मोदी म्हणाले.