शेती पिकांच्या पंचनाम्यासाठी भुसावळात शेतकर्‍यांचा मोर्चा

0

तहसिलबाहेर फेकली नुकसानग्रस्त पिके : दुबार पेरणीसाठी बियाण्यांची मागणी

भुसावळ: ऐन हंगामात परतीच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून भरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी तातडीने मोफत बियाणी मिळावे यासाठी विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी एकत्र येत पंचायत समिती ते तहसील कार्यालयादरम्यान बुधवारी सकाळी मोर्चा काढला. याप्रसंगी जय जवान जय किसानच्या घोेेषणांनी परीसर दणाणला. अखिल भारतीय सरपंच परीषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. संतप्त शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयाच्या परीसरात सोबत आणलेली खराब पीके फेकून आपला संताप व्यक्त केला.

खराब पिके गळ्यात टाकून काढला मोर्चा

भुसावळातील पंचायत समितीच्या आवारात सकाळी शेतकरी जमल्यानंतर खराब झालेल्या पिकांना गळ्यात टाकून मोर्चाला सुरुवात केली. मोर्चामध्ये तालुक्यातील तपतकठोरा, साकरी, अंजनसोंडा, जाडगाव, खडका, सावतर निंभोरा, हतनूर, वरणगाव, टहाकळी, पिंप्रीसेकम, आचेगाव आदी गावासह परीसरातील गावातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले. यावेळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात बंदोबस्त लावला होता.

या मागण्यांसाठी निघाला मोर्चा

पाणंद योजनेतर्फे होणार्‍या शेत रस्त्यांच्या रक्कमेत वाढ करावी तसेच हे रस्ते ठेकेदारास न देता ग्राम पंचायतीतर्फे करावे अथवा शेतकरी गटातर्फे करावे, मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज सरसकट माफ करावे, शेतसारा सरकटक माफ करावे, विमा कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबीत रक्कम त्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, तालुक्यात पीक वीमा कंपन्यांचे कार्यालय सुरू करावे, आगामी पेरणीसाठी शासनाकडून मोफत बियाणे मिळावे, शेतकर्‍यांचे प्रलंबीत वीज बील माफ करावेतसेच नियमीत वीज बील भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान मिळावे, अतिवृष्टीमुळे शेतीच्या रस्त्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतीच्या रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा, अशा मागण्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
तहसीलमध्ये मोर्चा आल्यानंतर निवेदन स्विकारण्यासाठी तहसीलदारांनी बाहेर यावे अशी मागणी करण्यात आली मात्र मोर्चेकर्‍यांनी आत दालनात यावे, असे उत्तर मिळाल्यानंतर शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करीत तहसील कार्यालयाच्या आवारात पावसामुळे खराब झालेली ज्वारीचे कणसे, सोयाबीन, कपाशीची पिके,उडीद, मुग, भुईमुग, मका आदी पिके तसेच खराब झाडे, फांद्यांची फेकाफेक केल्यानंतर तहसील आवारात अस्वच्छता झाली.