नागपूर – विदर्भातील शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. २४ तासापूर्वी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. दरम्यान आज नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. मौदा तालुक्यातील पिंपरी गावातील शंकर हरीभाऊ किरपाने या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. राज्याचे सोडाच मुख्यमंत्र्याच्या जिल्हात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतांना दिसत आहे.
शंकर किरपाने यांच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यासोबतच कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केले होते. पण नापिकी आणि शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. इतर शेतकऱ्यांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे शंकर किरपाने यांच्या कृषी सेवा केंद्रातील उधारीही वसूल झाली नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शंकर यांनी शुक्रवारी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
५ एकर शेतीत नापिकीने कर्जाचा डोंगर वाढतच गेला. अशा संकटात कृषी सेवा केंद्राचा आधार असायचा, पण परिसरातील शेतकरीही जगण्यासाठी पावलोपावली संघर्ष करत आहेत, त्यामुळे यंदा या शेतीच्या संकटात शंकर यांच्या कृषी सेवा केंद्राची वसुलीही झाली नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, खरिपाच्या तोंडावर शेतीत बी-बियाणे आणायला खिशात दमडीही नाही, कृषी सेवा केंद्रातही माल भरायला पैसा नाही. अशा आर्थिक संकटात जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेवटी शंकरने हार मानली आणि शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पण आता कुटुंबाचे काय? शंकरला १५ वर्षांचा मुलगा आणि १ मुलगी असे कुटुंब आहे.
शंकर यांच्या आत्महत्येने अवघे कुटुंबच आता रस्त्यावर आले आहे. विदर्भात सर्वाधिक कापसाचे पीक घेतले जाते, पण बोंडअळीने यंदा कापसाचे मोठे नुकसान केले, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, आता खरीप हंगाम महिनाभरावर आला आहे, त्यामुळे विदर्भातले शेतकरी खरिपात पेरणीसाठी बी-बियाणे आणि खतांची सोय कशी करायची याच्या विवंचनेत आहे. याच विवंचनेमुळे दरवर्षी खरीपाच्या तोंडावर विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढतात.
यंदा अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही, ना बोंडअळीच्या नुकसानीचे पैसे मिळाले. पीक विमातर बेभरवशाच्या पावसासारखाच आहे. त्यामुळेच यंदाही खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, बोंडअळीच्या नुकसान भरपाईचीही घोषणा केली. पण कागदी घोड्यांच्या सरकारी खेळात बरेच शेतकरी यापासून अद्यापही वंचित आहेत. त्यामुळेच शंकरसारख्या तरुण शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे.