फैजपूर- शहरातील धाडी नदीत सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने त्या ठिकणी सहा ते सात घरे ही गेल्या 20 वर्षांपासून असून या घरांना पालिकेने आधी पर्यायी जागा मिळवून द्यावी या मागणीसाठी गुरूवारी पालिकेसमोर पीआरपी अल्पसंख्याक आघाडीने एक दिवसीय उपोषण केले.
पर्यायी जागा न दिल्यास 9 रोजी रास्ता रोको
पालिकेंतर्गत धाडी नदी परीसरात गेल्या 20 वर्षांपासून रहिवासी तेथे राहतात. या सर्व रहिवाशांचे मतदान कार्ड, आधार कार्ड व रेशनिग कार्ड आहे. पालिका अच्छे दिनाच्या नावाखाली गरीब रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त करीत आहे. आधी या रहिवाशांना घरासाठी जागेची व्यवस्था करून द्यावी तरच तेथील रहिवाशी घर खाली करतील अन्यथा या मागणीसाठी 9 मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येइल, असा इृशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. पीआरपीचे शेख आरीफ, गोपी साळी यांच्यासह मुस्लिम पुरुष व महिला एक दिवसीय उपोषणात सहभागी झाले.
कुरेशी मोहल्ला व धोबीवाडा पूर्वेकडील घरांनी अतिक्रमण काढावे -मुख्याधिकारी
पालिकेने धाडी नदी पात्रातील सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. धाडी नदीमधील संरक्षण भिंतीला लागून घरांनी अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सुरू करायचे आहे. पूर्वेकडील अतिक्रमण केलेल्या रहिवाश्यांनी ते अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा पालिकेला कारवाई करावी लागेल. 9 मे रोजी होणार्या चेतावणी रास्ता रोकोत काही अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण जबाबदारी आंदोलनकर्त्यांची असेल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी सुवर्णा ओगले शिंदे यांनी दिले आहे.