सीरियात रासायनिक हल्ल्यानंतर भयावह स्थिती

0

दमिश्क : सीरियातील इदलिब प्रांतात मंगळवारी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सर्वत्र विषारी वायू पसरल्याने 11 छोट्या मुलांसह 100 लोकांचा बळी गेला. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त लोक अत्यावस्थ आहेत. सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सनुसार इसिसच्या ताब्यातील खान शेखौन शहरावर हा हल्ला करण्यात आला. सीरिया किंवा रशियन सेनेने हल्ला केल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. हल्ला दहशतवाद्यांच्या गोडाऊनवरही करण्यात आल्याने गोडाऊनमधील विषारी पदार्थ हवेत पसरल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेचा संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेसह अन्य देशांनी निषेध केला आहे. हल्ल्यानंतरची भयावह छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली असून छोट्या मुलांसह मोठी माणसेही तडफडताना दिसत आहेत. रासायनिक हल्ल्यानंतर बुधवारी संयुक्त राष्ट्र संघाने सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती.

पीडितांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न
रासायनिक हल्ला सर्वाधिक घातक असतो. आंतरराष्ट्रीय नियमानुसार अशा प्रकारच्या हल्ल्यांवर पुर्णपणे बंदी आहे. सीरियातील इदलिब प्रांतातील अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेनंतर चारही दिशांना मृत्यूचे तांडव सुरू होते. अत्यावस्थ झालेली लहान मुलं आणि महिला सर्वत्र पडल्याचे दिसत होते. रसायनाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वत पाणी मारले जात होते. तर अत्यावस्थ झालेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांना रूग्णालयात हलविण्यात येत होते. या हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला असून 400 जणांना बाधा झाली आहे. बाधा झालेल्यांना श्‍वास घेण्यास त्रास, उल्टी, तोंडातून फेस येणे, असा त्रास होत आहे. अनेक लोक बेशुध्द पडले आहेत. डाक्टरांनी सांगितले की अनेकांचा मृत्यू श्‍वास कोंडल्यामुळे झाला आहे.

सरकार जबाबदार : अमेरिका
सीरियाच्या इदलिब प्रांतात झालेल्या रासायनिक हल्ल्याला सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असर जबाबदार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. व्हाइट हाऊस प्रवक्ता सीन स्पाईसर यांनी म्हटले की, इदलिबमधील निष्पाप लोकांवर केलेला रासायनिक हल्ला निंदनीय आहे. हा प्रकार सभ्य समाज कधीही विसरू शकत नाही. येथील कमजोर प्रशासनामुळे ही घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने याकडे युध्द गुन्हा म्हणून पाहून तपास केला पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक
रासायनिक हल्ल्यानंतर बुधवारी संयुक्त राष्ट्र संघाने सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत विमानातून केलेल्या रासायनिक हल्ल्याला युध्द गुन्हा मानून तपास करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरस या हल्ल्यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.

राष्ट्रपतींचे दहशतवाद्यांवर आरोप
सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांनी या हल्ल्यासाठी दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले आहे. परंतू सीरियातील विरोधी पक्ष असलेल्या सीरियन नॅशनल कॉलिजनने आरोप केला आहे की, हा हल्ला सीरिया सरकारने केला आहे. विरोधी पक्षाने असेही म्हटले आहे की, 2013 मध्येही सरकाने अशाच प्रकारचा हल्ला केला होता. दरम्यान, मंगळवारी झालेला हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.