जळगाव – माजी महापौर रमेश जैन आणि नाट्यकलावंतांमध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास बालगंधर्व नाट्यगृह येथे जोरदार खडाजंगी झाली. यावेळी जैन यांनी बालगंधर्व नाट्यगृहामध्ये सुरू असलेल्या स्टेजच्या काँक्रिटीकरणाबद्दल आपले समर्थन दर्शवले यामुळे नाट्य कलावंतांमध्ये आणि रमेश जैन यांच्यात वादाला तोंड फुटले. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांचाही यावेळी बोलताना तोल सुटला.
जळगाव शहरातील नाट्य कलावंतांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला बालगंधर्व नाट्यगृहातील रंगमंचाचे काँक्रिटीकरणाला सकाळी रमेश जैन यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना रमेश जैन म्हणाले की, नाट्य गृहातील रंगमंचाला लाकडी फ्लोरिंग केले तर गायन करणार्या कलावंतांना इकोच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. यामुळे या ठिकाणी स्टेटचे काँक्रिटीकरण करण्यात गरजेचे आहे. जैन यांना प्रतिवाद करत नाट्यकलावंत म्हणाले, की बालगंधर्व नाट्यगृहाला नाटकाची मोठी परंपरा आहे. याचबरोबर या ठिकाणी खुद्द पंडित भीमसेन जोशी हे देखील गायन करून गेले आहेत. अशा वेळेस या ठिकाणी गायनाला नक्की अडथळा तरी कसा येईल ? असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना जैन हे जे काही वाक्य बोलले त्यामुळे नाट्य कलावंत आणि जैन यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
स्टेज मेन्टेन कोण करणार?
बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे रंगमंचाला जर लाकडी फ्लोरिंग केली तर त्याला मेन्टेन कोण करणार? असा प्रश्न यावेळी रमेश जैन यांनी नाट्यकलावंतांना विचारला.
देखभालीचे काम महापालिकेचेच
रमेश जैन यांना उत्तर देताना नाट्य कलावंत म्हणाले की, ही सरकारी मालमत्ता असून ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही ह्याची देखभाल करण्याचे संपूर्ण काम हे मनपाचेच आहे.
सुरेशदादांनी 30 वर्ष काय केले ?
गेले 30 वर्षापासून सुरेशदादा जैन यांची जळगाव शहरात सत्ता होती. महानगरपालिकेवरदेखील दादांची सत्ता होती. तेव्हापासून जळगाव शहराला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करायचे असे ते म्हणत होते. मात्र त्यांनी गेल्या 30 वर्षात काय केले ? असा प्रश्नही या वेळी नाट्यकर्मींनी जैन यांना विचारला.
चौघांनी दिशाभूल करणारी माहिती पुरवली – रमेश भोळे
रमेश जैन यांना आम्हा नाट्यकलावंतांच्या विरुद्ध दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे आणि हे काम दीपक चांदोरकर, पीयूष रावळ, शिरीष बर्वे व हेमंत कुलकर्णी ही मंडळी करत आहेत. यामुळे जैन आमच्याशी बोलताना जणू आम्हाला नाटकातले काही कळतच नाही, अशा रुबाबात बोलत होते, अशी प्रतिक्रिया जळगाव शहरातील ज्येष्ठ नाट्यकलावंत रमेश भोळे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.कोणीही चुकीची माहिती दिलेली नाही – रमेश जैन
मला कोणीही चुकीची माहिती दिली नसून, त्या ठिकाणी महापालिकेतर्फे बोलावेले गेले होते. याच बरोबर त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यातील नक्की किती नाट्य कलावंत होते हा प्रश्न मला विचारावासा वाटतो. त्या ठिकाणी कोणाताही वाद झालेला नाही, अशी प्रतिक्रिया रमेश जैन यांनी ‘जनशक्तीशी’ बोलताना दिली.मी अभ्यास करूनच मत दिले – हेमंत कुलकर्णी
मी कोणतीही चुकीची माहिती रमेश जैन यांना दिलेली नाही. नाट्यगृह माझी वैयक्तिक मालमत्ता नाही. नाट्यगृह सुधारावे या हेतूने मी त्या ठिकाणी लाकडी किंवा काँक्रिटीकरण केलेला रंगमंच असावा असा सल्ला दिला होता. नाट्यगृहाचा अभ्यास करून मी हे मत दिले होते, असे हेमंत कुलकर्णी म्हणाले.माझा काहीही संबंध नाही – बर्वे
नाट्यगृहात लाकडी स्टेज असावे हे मीच रमेश जैन यांना सुचवले होते. मी त्यांना चुकीचे सांगण्याचा संबंध नाही, असे आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.मी फार छोटा माणूस – रावळ
तुम्ही रमेश जैन यांना चुकीचे काही सांगितले का ? असा प्रश्न पीयूष रावळ यांना विचारला असता त्यांनी सांगितले, की मी फार छोटा माणूस आहे. मी रमेश जैन यांची दिशाभूल करू शकत नाही.