पुलवामा – जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील वरपोरात शनिवारी दहशतवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला आहे. चकमकीदरम्यान दहशतवादी पळून गेले. जे. डी. मंदीप कुमार (२७) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. ते सीआरपीएफच्या १८२ बटालियनमध्ये कार्यरत होते. चकमकीदरम्यान गोळी लागल्याने जे गंभीर जखमी झाले होते.
दहशदवादी पळाले
वरपोरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, ५५ राष्ट्रिय रायफल आणि सिआरपीएफच्या १८२ व १८३ बटालियनने येथे संयुक्त घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ही चकमक उडाली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून गेल्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास मोहीम थांबली.
दरम्यान, दोन निवासी घरांचेही नुकसान झाले असून नागरीक आणि घरमालक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना आडकवण्यात सरक्षारक्षक दलाच्या जवानांना यश आले होते.