। भुसावळ प्रतिनिधी ।
साकरी ते फेकरी रेल्वे उड्डाणपूल दरम्यान साकरी शिवारात रस्त्यावर सार्वजनिक जागी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी करण संतोष सपकाळे, संतोष शंकर सपकाळे, जीवन रतन सपकाळे (मुळ रा. खडके, हल्ली मुक्काम माहित नाही) यांनी संगनमत करून अक्षय सोनवणे व मंगेश काळे यांच्याशी असलेल्या अज्ञात वादावरून कारण काढून त्याच्या ताब्यातील डिस्कव्हर मोटरसायकलवरून पाठीमागून येऊन फिर्यादी बसलेले शिफ्ट गाडी (क्र. एम. एच १९ डी. व्ही. ००७१) या गाडीस ओव्हरटेक करून गाडी थांबवून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने करण संतोष सपकाळे याने त्याच्या जवळील पिस्तूलने गोळीबार केला होता. त्यात अक्षय रतन सोनवणे (वय २६) याचे पोटात व मंगेश अंबादास काळे (वय २५) याच्या छातीस गोळ्या लागून गंभीररित्या जखमी झाले आहे. म्हणून धीरज प्रकाश सोनवणे (वय ३६, रा. पाण्याची टाकीजवळ, खडके ) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि प्रकाश वानखेडे करीत आहे.
गावात शोकाकुल वातावरण
अक्षय सोनवणे या तरुणाच्या पोटात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना शनिवारी, २२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्याच्या मृत्यूमुळे गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.