अखेर यावल नगरपालिकेने केली जास्तीची पाणीपट्टी रद्द

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नाना मोठे यश

यावल, प्रतिनिधी – माजी नगराध्यक्ष यांनी केलेल्या तक्रारीनंतर विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांना बसणाऱ्या जास्तीच्या पाणीपट्टीचा भुर्दंड अखेर नगरपालिका प्रशासनाने रद्द केला आहे. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले. परिणामी नवीन वसाहतीतील नागरिकांनी अतुल पाटील याचे आभार मानले आहेत.

शहरातील विस्तारित कॉलनी भागात पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून तडवी कॉलनीत १० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला आहे. पाणी वितरणासाठी पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहे. पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्या भागातील नागरिकांनी अनामत रक्कम व आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा करून नळ जोडणी केली. मात्र, मार्च २०२२ पर्यंत या नळांना पाणीच आले नाही. परिणामी या ३२८ नळधारकांना पाणीपट्टी शुल्क आकारू नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी १७ मार्च २०२२ रोजी पत्र देऊन केली होती. ही मागणी मंजूर देखील करण्यात आली. मागील वर्षी नवीन नळधारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता पालिकेने दिलासा दिला होता. पण, यंदा २०२३/२४ मध्ये पालिकेने पाठविलेल्या पाणीपट्टी बिलात मागील वर्षाची थकबाकी १,५०० आणि व्याजाचे १२० यासह चालु वर्षाचे १,५०० असे एकूण ३ हजार १२० रुपयांची पाणीपट्टी आकारली होती.
नागरिकांना पाठविण्यात आलेल पाणीपट्टी शुल्क बेकायदेशीर असुन नवीन नळधराकांवर अन्याय करणारे आहे परिणामी ते रद्द करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचा ईशारा अतुल पाटील यांनी दिला होता.
यानंतर पालिका प्रशासनाने थकबाकीचे १ हजार ६२० रुपयांची आकारणी रद्द करण्याचे पत्रच अतुल पाटील यांना दिले आहे. ऑनलाईन प्रणाली मध्ये बदल झाल्याने सदरचे बिल चुकून पाठविले गेल्याचे पालिकेने मान्य केले आहे.
पालिकेची ही आकारणी बेकायदेशीर होती. नवीन नळधारकांना पाणीपट्टी बिल मिळाल्यानंतर जागरूक नागरिकांनी माझ्याशी संपर्क करून हि बाब निदर्शनास आणून दिली. परिणामी आपण तत्काळ पालिकेला पत्र देऊन अवगत केले. सजग नागरिक यांचे मुळे हा प्रश्न प्रशासनासमोर मांडता आला व त्याला यश मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी ‘जनशक्ती’ सोबत बोलतांना सांगितले.