वरणगावातील घनकचरा प्रकल्पाला आग, सेंद्रीय खताचे नुकसान !
परिसरातील शेती पिक व रहीवाशांना प्रदुषणाचा धोका
वरणगांव । प्रतिनिधी
शहरातील नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला वाढलेल्या तापमानामुळे बुधवारी सांयकाळी सौम्य आग लागली . मात्र, गुरुवारी दुपारी वाऱ्यामुळे कचर्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला . यामुळे नगर परिषद व आयुध निर्माणी वरणगांवच्या अग्निशामक दलाने धाव घेवून आगीवर नियत्रंण मिळवले. मात्र, यामुळे परिसरातील शेती पिकांना तसेच रहिवाशांना प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे .
शहरातील केर कचरा सिध्देश्वर नगर भागातील नगर परिषदेच्या घन कचरा प्रकल्पात साठवून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाते. मात्र, सद्यस्थितीतील वाढते तापमान व सुटणारा वारा यामुळे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला बुधवारी सौम्य प्रकारची आग लागली. या आगीने गुरुवारी दुपारी वाढलेल्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात पेट घेतला . यामुळे नगर परिषद व आयुध निर्माणी वरणगांवच्या अगिशामक दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, अग्निशामक दल जाताच कचऱ्यातील धुसफुस सुरु असलेल्या आगीने पुन्हा पेट घेतल्याने प्रकल्पाच्या परिसरातील शेती पिकांना व रहिवाशांना प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. तर घन कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या ज्वाळामुळे परिसरात तयार करण्यात आलेल्या सेंद्रीय खताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तसेच आग आटोक्यात नाही आल्यास पुन्हा नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . प्रकल्पाच्या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख व अधिकारी, कर्मचारी यांनी पाहणी करून उपाय योजनांच्या अंमल बजावणीला सुरुवात केली आहे .