| जळगाव प्रतिनिधी । येथील औद्योगिक वसाहतीतील आकाश भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या आठ बंबांद्वारे पाण्याचा मारा करीत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे दोन ते अडीच तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अयोध्यानगर येथील रहिवासी खंडू किसन पवार यांची एमआयडीसीमधील जी-७६
मध्ये आकाश प्लॉस्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. याचवेळी खंडू पवार यांचा मुलगा हा फॅक्टरीमध्ये आला. तेव्हा त्याला धुराचे मोठ्याप्रमाणात लोट पसरलेले दिसून आले. फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तर फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे कळाल्यानंतर बंडू पवार हे सुध्दा त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांच्यासह इतर कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
आठ बंबांनी वीजवली आग
महापालिका अग्निशमन विभागाचे बंब घटनेच्या अर्धा ते पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. तब्बल आठ बंबांद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला तर फोमचा सुध्दा वापर करण्यात आला. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. दरम्यान, या आगीमध्ये प्लॉस्टीक वेस्ट वेटेरिअलसह ठिबक नळ्या आणि ठिबक नळ्या तयार करणाऱ्या दोन महागड्या मशिनी जळून खाक झाल्या. या आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे फॅक्टरी मालक बंडू पवार यांनी बोलताना सांगितले. तसेच बाजूच्या एका कंपनीला सुध्दा आगीची झळ बसली असून त्यात काही पत्रे जळाले आहेत.