नौदलाकडून अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया

0

नवी दिल्ली: अनेकांची सैन्यात सेवा करण्याची इच्छा असते. मात्र काहींची ही इच्छा पूर्ण होते, काहींची होत नाही. दरम्यान आता नौदलाकडून अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्यामुळे सैन्य दलात जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे.

यावर्षी सप्टेंबरमध्ये इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (आयएनईटी) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटरवर असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास थेट नौदलात अधिकारी होण्याची संधी मिळेल. या परीक्षेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या (कायम आणि ठराविक कालावधीसाठी) सेवेतल्या अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. सध्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता आयएनईटीकडून उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातील.

दर सहा महिन्यांनी परीक्षेसाठी सूचना प्रसिद्ध केली जाईल. भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर (joinindiannavy.gov.in) याबद्दलची माहिती उपलब्ध असेल. या माहितीच्या आधारे अर्ज करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या पात्रतेनुसार पर्याय निवडू शकतात. या परीक्षेसोबत यूपीएसईच्या माध्यमातून होणारी भरतीदेखील सुरूच असेल. यूपीएसई कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामच्या (सीडीएस) माध्यमातून नौदलात अधिकाऱ्यांची भरती केली जाते.