न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा पहिल्या महिला वकील

0

नवी दिल्ली- सरकारने वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या कोलेजियमच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. इंदू मल्होत्रा पुढील आठवड्यात शपथ घेण्याची शक्यता आहे. न्यायाधीश बनल्यास त्या पहिल्या महिला वकील ठरणार आहे. वकील ते थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा ह्या देशाच्या पहिल्या महिला वकील ठरल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा या सातव्या महिला आहेत.

1989 मध्ये फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या. यानतंर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना देसाई आणि आर भानुमती ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या होत्या. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या 24 न्यायाधीशांमध्ये आर भानूमती ह्या एकच महिला न्यायाधीश आहे. आता 61 वर्षीय इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश असतील.

ऑगस्ट 2007 मध्ये इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. तीन दशकांआधी म्हणजेच 1977 मध्ये लीला सेठ सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील बनल्या होत्या. तसंच हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनण्याचा मानही त्यांना मिळाला होता. 11 जानेवारी रोजी इंदू मल्होत्रा यांच्या नावाची शिफारस पाठवण्यात आली होती. ही शिफारस तीन महिन्यांपासून सरकारकडे प्रलंबित असल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना यासंदर्भात पत्रही लिहिलं होत.