राज्यात उष्मघाताचा पहिला बळी, पुढील तीन दिवस उष्णतेची लाट

पुणे : जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सरली असून तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच रावेर येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. नम्रता दिनेश चौधरी (वय-३९) असे मृत महिलेचे नाव आहे.

रावेर शहरातील केबल व्यावसायिक असलेले दिनेश नथ्थू चौधरी हे त्यांच्या पत्नी नम्रता चौधरीसह मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण येथे संत मुक्ताबाईच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर दोघं तिथून जवळ असलेल्या वरणगाव येथे माहेरात गेले. या ठिकाणी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना चक्कर, उलटी झाल्याने तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उपचारादरम्यान डॉक्टरांनी उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रावेरमध्ये आज ४५.७ डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुढील तीन दिवस हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरात तापमानानं उच्चांक गाठला आहे.

 

का आली उष्णतेची लाट

बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील ७२ तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.