पुणे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या कात्रज परिसरातील शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून जाहीर झालेला पाच कोटी रुपयांचा धनादेश आज प्रदान करण्यात आला. पुण्यातील सर्किट हाऊस येथे हा कार्यक्रम पार पडला.
राज्य सरकारने पुण्यातील बावधन येथील बी डी पी च्या जागेवर पन्नास एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्या खासगी शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या या शिवसृष्टीबाबत कोणत्याही हालचाली होत नसताना पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाच कोटींचा धनादेश देण्यात आला आहे. या प्रकारामुळे आगामी काळात यावरून राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत.